सीएनजी’, ‘पीएनजी’ गॅस महागला. नवे दर काय?

पुणे : स्वस्त इंधनाचा पर्याय असलेल्या ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ गॅसच्या किमतीत वाढ झाली असून, सीएनजी आता प्रतिकिलो एक रुपये २५ पैशांनी, तर ‘पीएनजी’ दीड रुपयाने महागणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडीसह नाशिक आणि धुळे परिसरातील ग्राहकांना गुरुवारी (१२ नोव्हेंबर) मध्यरात्रीपासून या दरवाढीचा फटका बसणार आहे.

पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात एक किलो ‘सीएनजी’साठी ९९ रुपये, तर ‘पीएनजी’साठी प्रति घनमीटर ५३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर नाशिक आणि धुळे परिसरात एक किलो ‘सीएनजी’साठी ९९ रुपये ७५ पैसे, तर ‘पीएनजी’साठी प्रति घनमीटर ५१ रुपये ७५ पैसे मोजावे लागणार आहेत.

‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’साठी आवश्यक नैसर्गिक वायूच्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे दरवाढ करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. गॅस पुरवठ्यात आयात केलेल्या गॅसचे प्रमाण वाढत असून, आयात केलेल्या RLNG (रिगॅसिफाईड लिक्विफाईड नॅचरल गॅस) ची किंमतही वाढली आहे. त्यामुळे ही दरवाढ करावी लागल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दरवाढीनंतरही सीएनजी हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन पर्याय असल्याचा दावा कंपनीने केला आहे. वाहनांसाठी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी हा इंधनाचा स्वस्त पर्याय आहे. ‘सीएनजी’मुळे प्रवासी चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २३ टक्के बचत करता येते. रिक्षाचालकांना सुमारे २५ टक्के बचत करता येते, असे ‘एमएनजीएल’कडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे दरवाढीनंतरही सीएनजी वापरणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे कंपनीकडून नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button