
सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी वाढते; गैरफायदा घेणाऱ्यांवर FDAने कारवाई करावी : योगेश कदम
खेड : सण-उत्सवांच्या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीचा काहीजण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अधिकाधिक कारवाया कराव्यात, अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली.
सण-उत्सवांच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तपासणी व कारवाई होणे आवश्यक आहे. विशेषतः मिठाईची मागणी वाढलेल्या काळात संबंधित व्यावसायिकांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे कदम यांनी सांगितले.
“सण-उत्सवांच्या दरम्यान अशा प्रकारच्या कारवाया जास्तीत जास्त प्रमाणात झाल्या पाहिजेत, हा आमचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे. मिठाईची मागणी वाढलेली असते आणि या वाढलेल्या मागणीचा गैरफायदा काही मंडळी घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित असून, ती कारवाई आम्ही करतो,” असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी FDAच्या तपासणी मोहिमांना अधिक गती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.




