
तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक
Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणारे तूप तयार करताना रिफाइंड पाम ऑइल, पामोलिन, पाम कर्नेल ऑइलसह विविध रसायनांचा कथित वापर करण्यात आल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) म्हटले आहे. या प्रकरणात तूप उत्पादक कंपनी ‘सुकृती फूड्स’चे प्रवर्तक कैलासचंद मंगला यांना ईडीने अटक केली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, कैलासचंद मंगला यांना १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथील ईडीच्या कार्यालयाने तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) तूप भेसळ प्रकरणात अटक केली. त्यांना विशाखापट्टणम येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
ईडीच्या तपासात तिरुपती लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात कथित भेसळ करण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या बनावट तुपाच्या निर्मितीसाठी रिफाइंड पाम ऑइल, पाम कर्नेल ऑइल, पामोलिन तसेच MG-90, मोनोग्लिसराइड्स, मायव्हॅसेट सॉफ्ट 400 आणि ॲसिटिक ॲसिड एस्टर यांसारख्या रसायनांचा वापर केल्याचे ईडीने म्हटले आहे.
हे भेसळयुक्त तूप ‘अॅगमार्क स्पेशल ग्रेड काऊ घी’ असल्याचे भासवून TTDला पुरवण्यात आल्याचा आरोप आहे.
२०१९ ते २०२४ या कालावधीत TTDला करण्यात आलेल्या कथित बनावट तुपाच्या पुरवठ्याची किंमत सुमारे २३० कोटी रुपये असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यापैकी सुमारे ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप कैलासचंद मंगला यांनी तयार केल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
मंगला हे या कथित कटातील सहआरोपी असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यांनी भेसळयुक्त पदार्थांची खरेदी सुलभ केली आणि आपल्या कारखान्यात भेसळयुक्त तुपाची निर्मिती केल्याचा आरोप आहे.
तसेच श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि ए. आर. डेअरी फूड्स यांसारख्या कथित बनावट संस्थांच्या माध्यमातून भेसळयुक्त तुपाचा पुरवठा करण्याचे समन्वय मंगला यांनी केल्याचा दावा ईडीने केला आहे.
भेसळयुक्त पदार्थांचा प्रत्यक्ष वापर लपवण्यासाठी तसेच अस्सल गायीचे तूप तयार करून त्याचा पुरवठा केल्याचे भासवण्यासाठी तूप आणि रिफाइंड पाम ऑइलच्या खरेदी-विक्रीशी संबंधित खोट्या नोंदी तयार केल्याचा आरोपही ईडीने केला आहे.
या प्रकरणात ईडीने यापूर्वी ‘भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी मिल्क’चे प्रवर्तक आणि संचालक विपिन जैन यांनाही अशाच आरोपांखाली अटक केली आहे.



