
रात्री 2 वाजता जरांगेंनी घेतली सभा, हजारो मराठ्यांच्या गर्दीसमोर नेमकं काय म्हणाले?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता बीडच्या पाटोदा येथे सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी, “आता माझ्याकडून होत नाही.माझ्या पाठीमागे येऊ नका नाहीतर इथेच उपोषण सुरु करीन किंवा अंतरवालीला परत जाईन. मला पुढचा दौरा शक्य नाही. मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून थेट मुंबईला जाणार,” असं म्हटलं आहे. रात्री दोन वाजता झालेल्या या सभेसाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेमध्ये जरांगेंनी आपण मुंबईचा दौरा रद्द करु शकतो असंही म्हटलं आहे.
मी घाबरणारा नाही
मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांचा रात्रीचा मुक्काम पाटोदा येथे होता. रात्री साधारणता दीड वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील हे पाटोदा येथे दाखल झाले. एवढा उशीर होऊन देखील हजारो मराठा समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. “तुमच्यासमोर भरपूर बोलत असतो पण आता बोलता येत नाही. आपल्यासाठी समाज फार महत्वाचा आहे. आपल्यासाठी कोणी नाही हे लक्षात ठेवा. आपला समाज आपल्याला मोठा करायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, लढायला शिका. सगळ्याची लेकरं एसीमध्ये बसली आहेत. मी चांगल्या चांगल्याला जेरीस आणतो. मी घाबरणारा नाही. मी खचलो नाही,” असं जरांगे जनसमुदायाला उद्देशून म्हणाले.




