
सेट परीक्षा चौथ्यांदा लांबणीवर. आता कारण काय? परीक्षा कधी होणार?
Set Exam पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी आयोजित करण्यात येणारी सेट परीक्षा (राज्यस्तरीय पात्रता परीक्षा) चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट परीक्षेचे सदस्य सचिव यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ४१ वी सेट परीक्षा २६ जुलै रोजी होणार होती. एमपीएससी परीक्षा, आषाढी वारी अशा कारणांनी परीक्षा पुढे ढकलून ६ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र, त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) होणार असल्याने पुन्हा सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आले आहे. याशिवाय, २५ सप्टेंबर रोजी ‘अनंत चतुर्दशी’ असल्याने उमेदवारांना प्रवासासाठी आणि परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात व्यावहारिक अडचणी उद्भवू शकतात. या बाबत प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
आता २५ ऑक्टोबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षार्थींच्या हिताचा आणि परीक्षा आयोजनातील सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व संबंधित परीक्षार्थींनी या नवीन तारखेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सेट विभाग हा प्राधिकृत विभाग आहे. सेट विभाग हा राज्य शासनाची समन्वयक संस्था असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र, गोवा राज्यात सेट परीक्षा आयोजित केली जाते.




