गणेशोत्सवासाठी चिपळूणकडे निघालेल्या दुचाकीला खवटीत भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू


२५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली दुचाकी; तरुणी गंभीर जखमी


गणेशोत्सवासाठी पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने दुचाकीवरून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक रविवारी सकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती महामार्गालगत असलेल्या २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार सतीश निवृत्ती पाटे (२९, रा. पोलादपूर) यांचा मृत्यू झाला, तर मागे बसलेल्या अक्षता अरविंद कवडे (२८, रा. चिपळूण) या गंभीर जखमी झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटे आणि अक्षता कवडे हे दोघे गणेशोत्सवासाठी पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत होते. खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर आल्यानंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी महामार्गालगत असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांच्या वतीने भरणे नाका ब्रिजखाली अपघातग्रस्तांसाठी २४ तास कार्यरत असलेली मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी अक्षता कवडे तसेच सतीश पाटे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सतीश पाटे यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी अक्षता कवडे यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button