
मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडलेली पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
आमदार नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्टेशनवर दाखवला झेंडा
चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी पर्यंतची मोदी एक्स्प्रेस ही पहिली ट्रेन आज दुपारी 12 वाजता दादर स्टेशनवरून कोकणाकडे रवाना झाली. प्रवाशांच्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्ग साठी रवाना झाली. मंत्री नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेस ला झेंडा दाखवला.
गणेशोत्सवाच्या काळात आरक्षण मिळत नाही, खासगी गाड्यांचे वाढलेले तिकीट यामुळे चाकरमान्यांना तिकीट मिळण्यास अडचणी निर्माण होतात अशा वेळी मोदी एक्सप्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.
गेली 14 वर्षे अविरतपणे मंत्री नितेश राणे यांनी स्वखर्चाने गणेशभक्तांना प्रवासाची मोफत सुविधा दिली आहे. दुसरी मोदी एक्सप्रेस ट्रेन रविवार 13 सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे. दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.





