
शरीरशास्त्रासोबत ’निरोगी जीवशास्त्रही आवश्यक, सामाजिक कार्यकर्ते अमेय परूळेकर यांची मागणी
शरीराची रचना आणि अवयवांची माहिती देण्याबरोबरच शरीर निरोगी कसे ठेवावे, योग्य आहार-विहार कोणता असावा आणि आजारांपासून बचाव कसा करावा, याचेही धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच मिळावेत, अशी मागणी रत्नागिरीतील नागरिक अमेय परुळेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मध्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सध्याच्या शालेय अभ्यासक्रमात मानवी शरीराची रचना, विविध अवयव आणि त्यांची कार्ये याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. मात्र, शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा, कोणत्या सवयी टाळाव्यात आणि आहार-विहाराचे नियम काय असावेत, याबाबत पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याचे परुळेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. शालेय शिक्षण पद्धतीत काळानुरूप बदल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच आरोग्यविषयक योग्य सवयी लागल्यास भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे केवळ शरीरशास्त्र शिकविण्याऐवजी दैनंदिन जीवनात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञानही अभ्यासक्रमाचा भाग असावे, अशी त्यांची भूमिका आहे.



