
कोकणचे सुपुत्र शशांक कोंडविलकर यांचे ‘गौरी गणपती सणा’ भक्तिगीत गणेशभक्ताच्या भेटीला

गुहागर : कोकणातील गणेशोत्सवाची ओढ, कुटुंब, श्रद्धा आणि संकटात बाप्पावर असलेला विश्वास मांडणारं ‘गौरी गणपती सणा’ हे नवं मराठी गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. “आसुसला जीव वेडा… तुझ्या दर्शना…” या भावनेतून गणपतीसाठी गावी जाण्याची ओढ या गीतात मांडण्यात आली आहे. या गीताची संकल्पना व लेखन कोकणचे सुपुत्र शशांक सूर्यकांत कोंडविलकर यांची आहे.
नोकरी जाणे आणि पगार न मिळाल्यामुळे गणपतीला गावी जाता येणार नाही, अशा संकटात सापडलेल्या एका कुटुंबाची भावनिक कथा या गीतातून उलगडते. मात्र बाप्पावरचा विश्वास कायम राहतो आणि संकटाच्या वेळी बाप्पाच मार्ग दाखवतो, हा संदेश “देव माझा पावला… संकटी या धावला…” या शब्दांतून देण्यात आला आहे.
गीताची संकल्पना व लेखन कोकणचे सुपुत्र शशांक सूर्यकांत कोंडविलकर यांचे असून संगीत निखिल गमरे यांनी दिले आहे. नितीश गमरे आणि शीतल टिपरे यांनी हे गीत गायले आहे. संगीत संयोजन व मिक्स-मास्टर सुनाम पाणीग्राही (जे आर स्टुडिओ, वसई) आणि कुंदन जाधव यांनी केले आहे. यामध्ये नितीन कुर्लेकर, दीपाली भुवड, निहीरा कुर्लेकर, मकरंद वैद्य, सचिन मोरे, समीर कोंडविलकर आणि रोशन घाटकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.
गीताचे दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन आणि ग्राफिक्स शशांक सूर्यकांत कोंडविलकर यांनी केले असून आय झेड कट्टा आणि नितीन कुर्लेकर ऑफिसिअल यांनी या गीताची निर्मिती केली आहे.




