आरोग्य संरक्षणाचे संजीवनी कवच: आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना



अचानक उद्भवणारे आजारपण केवळ शारीरिक त्रास घेऊन येत नाही, तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटून टाकते. गंभीर शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील (ICU) उपचार आणि महागडी औषधे यामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला या आर्थिक संकटातून कायमचा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २८ जुलै २०२३ च्या ऐतिहासिक निर्णयाद्वारे ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’ची व्याप्ती वाढवली आणि १ जुलै २०२४ पासून ही एकात्मिक योजना संपूर्ण लोकसंख्येसाठी लागू केली. आज ही योजना दुर्धर व खर्चिक आजारांवर उपचारासाठी सामान्यांच्या आयुष्यातील खरी ‘संजीवनी’ ठरत आहे.
योजनेची व्याप्ती आणि वैशिष्ट्ये: सर्वांसाठी ५ लाखांचे विमा कवच
ही योजना पूर्णपणे हमी तत्त्वावर (Assurance Mode) राबविली जात असून, द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या (Secondary & Tertiary Care) गंभीर आजारांवर उपचार पुरवते.
*प्रती कुटुंब रु. ५ लाखांचे संरक्षण: कुटुंबातील एका सदस्यासाठी किंवा संपूर्ण कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध आहेत.
*देशव्यापी लाभ: ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’चा लाभ राज्यातील कोणत्याही अंगीकृत शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात मिळतो, तर ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’मुळे देशभरातील कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात कॅशलेस उपचार घेता येतात.
*पहिल्याच दिवसापासून संरक्षण: इतर विमा कंपन्यांप्रमाणे या योजनेत जुन्या आजारांसाठी ‘वेटिंग पिरियड’ नाही; योजनेतील सर्व ३४ विशेष सेवांतर्गत आजार पहिल्या दिवसापासून संरक्षित आहेत.
*ज्येष्ठांसाठी ‘वय वंदना’: ७० वर्षे व त्याहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनेअंतर्गत अधिकचे रु. ५ लाख रुपयांचे स्वतंत्र विमा कवच दिले जात आहे, जे ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी मोठे वरदान ठरले आहे.
उपचार, औषधे ते प्रवासाचा खर्च; सर्वकाही निःशुल्क
अनेकदा रुग्णालयात केवळ बेडचा खर्च मिळतो आणि औषधे-तपासण्यांचा भुर्दंड रुग्णावर पडतो. मात्र, या योजनेत पॅकेज पद्धतीमुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यापासून घरी सुट्टी होईपर्यंत एकही रुपया द्यावा लागत नाही.
*पॅकेजमध्ये समाविष्ट घटक: जनरल वॉर्ड, नर्सिंग शुल्क, तज्ज्ञ डॉक्टर व भूलतज्ज्ञांची फी, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर शुल्क, रक्त संक्रमण (Blood Transfusion), एक्स-रे व निदान चाचण्या, तसेच आंतररुग्णाला दिला जाणारा पौष्टिक आहार.
प्रवास खर्च व अंतिम संस्कार सहाय्य: रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जाण्यासाठी एसटी बस किंवा रेल्वे द्वितीय श्रेणीच्या दरानुसार प्रवास खर्च दिला जातो. दुर्दैवाने उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास, मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत सन्मानाने नेण्याचा खर्चही याच योजनेच्या पॅकेजमधून केला जातो.
*लाखो रुपयांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता मोफत*
या योजनेमध्ये सामान्य आजारांपासून ते अत्यंत खर्चिक व अत्याधुनिक शस्त्रक्रियांचा समावेश आहे:
हृदयविकार: हार्ट अटॅकवरील उपचार, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर बसवणे आणि लहान मुलांमधील जन्मजात हृदयरोगावरील शस्त्रक्रिया.
अवयव प्रत्यारोपण (Organ Transplant): सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणारे किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट पूर्णपणे विनामूल्य.
कॅन्सर उपचार: शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी.
इतर गंभीर आजार: मेंदू व स्पाईन शस्त्रक्रिया, डायलिसिस, मुतखडा, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, हाडांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, जळीत रुग्ण, विषबाधा, सर्पदंश व नवजात बालकांचे अतिदक्षता उपचार.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रगती: आकड्यांमधून दिसणारे यश
रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनामुळे योजनेची अंमलबजावणी वेगाने होत आहे:
१,०४,४१० रुग्ण: जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक रुग्णांनी आजवर यशस्वी उपचार घेतले आहेत.
८,७५,८७३ आयुष्मान कार्ड्स: जिल्ह्यातील १६.५७ लाख पात्र लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक नागरिकांची कार्ड्स वितरित झाली आहेत.
२८,४६१ ज्येष्ठांना आधार: ‘वय वंदना’ योजनेतून ६४ हजार पात्र ज्येष्ठांपैकी २८ हजार ४६१ लाभार्थ्यांना कार्डचे वाटप पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी ८० शासकीय आणि १७ नामांकित खासगी रुग्णालये (उदा. बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल, परकार हॉस्पिटल, घरडा हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल इत्यादी) या सेवेत अहोरात्र कार्यरत आहेत.
पारदर्शक कारभार आणि तक्रार निवारण यंत्रणा
योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि रुग्णांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात ‘आरोग्यमित्र’ तैनात करण्यात आले आहेत, जे रुग्णाची नोंदणी व कागदपत्रांची पूर्तता विनामूल्य करून देतात.
याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली ‘जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती’ कार्यरत आहे. ही समिती रुग्णालयांची गुणवत्ता तपासणे, नवीन रुग्णालयांना मान्यता देणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे काम दर तीन महिन्यांच्या बैठकीद्वारे करते.
आयुष्मान कार्ड कसे मिळवाल
योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे.
नजीकच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र, सेतू केंद्र, आशा सेविका किंवा ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक यांच्या मदतीने हे कार्ड मोफत काढता येते.
नागरिक स्वतः गुगल प्ले स्टोअरवरून ‘Ayushman App’ डाउनलोड करून घरबसल्याही स्वतःचे कार्ड तयार करू शकतात.
निष्कर्ष: प्रत्येकाने आरोग्य कार्ड काढणे काळाची गरज!
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. संकट सांगून येत नाही. अशा वेळी उपचाराअभावी कोणावरही संकट कोसळू नये, यासाठी शासनाने ही योजना सर्वसमावेशक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित नागरिकांनीही आजच आपले ‘आयुष्मान कार्ड’ काढून घ्यावे आणि कुटुंबाला ५ लाखांचे भक्कम आरोग्य सुरक्षा कवच मिळवून द्यावे.
अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क: टोल फ्री क्रमांक: १४५५५ / १८०० २३३ २२० / १५५३८८ अधिकृत संकेतस्थळ: www.jeevandayee.gov.inस्थानिक संपर्क: अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र किंवा जिल्हा शल्य चिकित्सक / जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, रत्नागिरी.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button