
गवारेड्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे शुक्रवारी सकाळी गवारेड्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर (वय-३७) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. तीन दिवसांनी अखेर उपचारादरम्यान त्याचा सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. विशेष म्हणजे सह्याद्रीनगर मित्रमंडळातर्फे यंदाचा दहिहंडी उत्सव रद्द करून त्यातून जमा झालेला निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी देण्यात आला होता.
स्वप्नील पेडामकर हा शुक्रवारी सकाळी कामानिमित्त आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीकडे जात होता. याचवेळी आंबव येथे सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातून गवारेडा धावत रस्त्यावर आला व या गव्याची मोटारसायकलला धडक बसली. गव्याच्या जोरदार धडकेत रस्त्यावर फेकल्या गेल्याने स्वप्नीलच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथे एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर डेरवण येथील रुग्णालयात अधिक उपचार सुरू होते. त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्याची सोमवारी मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली व सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
त्याच्या अपघाती मृत्यूने सह्याद्रीनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. स्वप्नीलच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी साडवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. स्वप्नीलच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.




