
ताप आला अन् रुग्णालयात गेला, भारतीय गायकाचं दुबईत कॉन्सर्टआधी निधन
संगीत क्षेत्रातून अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचे दिग्गज गायक उदित नारायण यांच्यासारख्या हुबेहूब आवाजासाठी ओळखला जाणारा लोकप्रिय गायक निसार वायनाड याचे शनिवारी संध्याकाळी दुबईतील एका रुग्णालयात अचानक निधन झाले.तो अवघ्या ४४ वर्षांचा होता. अजमान येथील म्युझिक कॉन्सर्टच्या अवघ्या काही तासांआधीच त्याने अखेरचा श्वास घेतला.
निसार वायनाडचं मूळ नाव निसार अरोथ इब्राहिम आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. निसार वायनाडने शनिवारी दुपारी सांगितलं की त्याला खूप ताप आलाय. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अहवालानुसार, निसारचं निधन ‘ॲसिडोसिस’मुळे (Acidosis) झालं, असं सांगण्यात आलंय. मृत्यूआधी त्याचं शेवटचं बोलणं मित्र नौजास कयाक्कूलशी झालं होतं.
निसार वायनाडच्या मित्राने दिली माहिती
“काल सकाळी तो माझ्याबरोबरच होता. त्याला दोन दिवसांपासून ताप येत होता, पण पॅरासिटामॉल घेतल्यावर ताप कमी होईल असं त्याला वाटत होतं. दुपारी त्याचा फोन आला आणि रुग्णालयात जात असल्याचं त्याने सांगितलं. रुग्णालयातून गेल्यावर त्याची प्रकृती गंभीर असल्याचं मला समजलं. त्याच्या उपचारासंदर्भात मी सतत डॉक्टरांच्या संपर्कात होतो. पण दुर्दैवाने डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत,” असं नौजास कयाक्कूल यांनी सांगितलं.




