हिंजवडी येथे पायाभूत सुविधांसाठी रहिवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा; आदित्य ठाकरेंही झाले सहभागी!

पुणे : नळाद्वारे पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि चांगल्या रस्ते मिळत नसल्याने हिंजवडी येथील रहिवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांना आज आंदोलन करावे लागत आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधांसाठी हिंजवडी येथील रहिवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही सहभाग नोंदवला.

हिंजवडी, माण, मारूंजी परिसरात दररोज लाखो नागरिक, आयटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. खराब रस्ते आणि पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. शासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मोर्चात स्थानिक शेतकरी, रहिवासी, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन माण, हिंजवडी-माण-मारूंजी इन्फ्रा फोरम, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड को-ऑप हाऊसिंग फेडरेशन, मुळशी को-ऑप हाऊसिंग फेडरेशन या संघटना सहभागी झाल्या आहेत. या मोर्चाची सुरूवात हिंजवडीतील इन्फोसिस सर्कलपासून झाली असून हा मोर्चा शिवाजी चौकमार्गे पुन्हा इन्फोसिस सर्कल चौकात आला आणि तिथेच या मोर्चाची सांगता झाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी हिंजवडी येथे स्थानिक नागरिक, हाऊसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि आयटी प्रोफेशनल्सची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्रस्त नागरिकांनी प्रशासनाच्या आणि सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात पुकारलेल्या मोर्चात ते सहभागी झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज पुण्यात या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद हा अराजकीय आहे. आमच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते किंवा इतरही पक्षाचे कार्यकर्ते कोणताही राजकीय बॅनर न घेता या मोर्चात सहभागी झालेले आहेत. येथील सगळे स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी हा मोर्चा काढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता 2026 मध्ये आयटीपार्कमध्ये रस्त्यांसाठी, रस्त्यांवरील खड्डयांसाठी किंवा अस्वच्छतेसाठी, पाण्याच्या समस्येसाठी मोर्चा काढावा लागत असेल तर हे दुर्दैवी आहे, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या काय?

  • मुळशी धरणातून दोन टीएमसी पाण्याचा साठा निश्चित करावा.
  • रस्त्यांचे भूसंपादनाचे प्रश्न तातडीने निकाली काढावेत.
  • वाकड उड्डाणपुलासह भूमकर चौक, पुनावळे, ताथवडे येथील भुयारी मार्गातील वाहतूक कोंडी सोडवावी.
  • वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ दुप्पट करावे.
  • माण-शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करावी.
  • हिंजवडी-माण-मारूंजी परिसरासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा आढावा बैठक घ्यावी.
  • मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक हिंजवडीत घ्यावी.
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे त्रैमासिक आढावा घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button