विकासाला विरोध नाही; राजापूरचा निसर्ग उद्ध्वस्त करणारा विकास नको : राजन लाड

बॉक्साईट खाणींपेक्षा शाश्वत पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक रोजगारावर भर देण्याची मागणी



राजापूर : राजापूरच्या विकासाला कोणाचाही विरोध नाही; मात्र अल्पकालीन प्रकल्पांच्या नावाखाली येथील निसर्ग, पर्यावरण आणि स्थानिक अस्मिता धोक्यात आणणारा विकास स्वीकारार्ह नसल्याची भूमिका दळे-जैतापूर येथील राजन लाड यांनी मांडली आहे. राजापूरच्या नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे जतन करून शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून येथील विकास साधला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना लाड म्हणाले की, स्थानिक तरुणांच्या हाताला राजापूरमध्येच हक्काचा आणि कायमस्वरूपी रोजगार मिळणे आवश्यक आहे. मात्र, अवघ्या काही वर्षांसाठी होणाऱ्या खाण प्रकल्पांमुळे नैसर्गिक साधनसंपत्ती संपुष्टात येऊन भविष्यात उकरलेले डोंगर, पाण्याची टंचाई आणि धुळीने प्रदूषित गावे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये.
राजापूरला निसर्गाने भरभरून दिले असल्याचे सांगताना त्यांनी गावखडीच्या टोकापासून आंबेरी पुलापर्यंतचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, नद्या-खाड्यांचा परिसर, शेकडो वर्षांची मंदिरे व देवस्थाने, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे, पुरातन तलाव तसेच सह्याद्रीच्या कुशीत वसलेली निसर्गरम्य पर्यटनस्थळे यांचा उल्लेख केला.
या नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपत्तीचे जतन करूनच राजापूरची खरी प्रगती साधता येईल. तात्पुरत्या स्वरूपाच्या खाणींमागे न धावता शाश्वत पर्यटनाची क्षमता ओळखून त्यासाठी दूरदृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे लाड यांनी म्हटले आहे.
पर्यटनातून शिक्षण व आरोग्य सुविधांना बळ द्यावे
शाश्वत पर्यटन आणि स्थानिक उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून राजापूरमध्ये जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उभारल्या जाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दर्जेदार शाळा, कृषी व पर्यटनविषयक महाविद्यालये तसेच कौशल्य विकास केंद्रे सुरू झाल्यास स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
तसेच प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सुविधा, सुसज्ज रुग्णालये आणि फिरती आरोग्य पथके उपलब्ध व्हावीत, जेणेकरून गंभीर उपचारांसाठी नागरिकांना मुंबई किंवा कोल्हापूरसारख्या दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, अशीही मागणी त्यांनी केली.
स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी
राजापूरमधील मंदिरे, समुद्रकिनारे, पुरातन तलाव आणि सह्याद्री परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासातून स्थानिकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. हॉटेल व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शक, वाहतूक सेवा, होमस्टे, फळ प्रक्रिया आणि मत्स्यप्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास स्थानिक तरुणांना आपल्या घरच्या मातीतच कायमस्वरूपी रोजगार मिळू शकतो, असे लाड यांनी म्हटले आहे.
तात्पुरत्या स्वरूपाच्या काही वर्षांच्या खाणींपेक्षा पिढ्यान्पिढ्या रोजगार देणारा शाश्वत विकासाचा मार्ग अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाश्वत पर्यटन, उच्च दर्जाचे शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा आणि स्थानिक रोजगार या चार प्रमुख स्तंभांवर राजापूरच्या भविष्याचा विकास करण्याबाबत आजच्या लोकप्रतिनिधींनी दूरदृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे राजन लाड यांनी म्हटले आहे.
“आमचा विकासाला विरोध नाही. मात्र राजापूरची माती, निसर्ग, संस्कृती आणि पुढील पिढ्यांचा सन्मान राखणारा शाश्वत विकास हवा आहे,” अशी भूमिका त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button