रघुवीर घाटातील वाहतूक तब्बल ४० तासांनंतर पूर्ववत!___

महाकाय दरड हटविण्यासाठी दगडांचे ब्लास्टिंग; जेसीबीच्या मदतीने मार्ग झाला मोकळा


खेड-सातारा मार्गावरील रघुवीर घाटात कोसळलेली भलीमोठी दरड अखेर तब्बल ४० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हटविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले. गुरुवारी रात्री ९.३० वाजता ठप्प झालेली वाहतूक शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता पूर्ववत करण्यात आली. महाकाय दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागल्याने रस्ता मोकळा करण्याच्या कामाला मोठा कालावधी लागला.

गुरुवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास रघुवीर घाटातील खिंडीत अचानक भलीमोठी दरड कोसळली. दरडीतील मोठमोठे दगड आणि मातीचा प्रचंड ढिगारा थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला.

रघुवीर घाटाच्या पलीकडील भागातून अनेक नागरिक खेड येथे शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विविध कामांसाठी दररोज ये-जा करतात. मात्र घाट बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. अनेकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागला.

दरड कोसळल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून रस्ता मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. जेसीबी आणि फोकलेनच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली माती आणि दगड हटविण्याचे काम करण्यात आले. मात्र काही दगड आकाराने अत्यंत मोठे असल्याने ते यंत्रांच्या सहाय्याने हटविणे शक्य होत नव्हते.

अखेर महाकाय दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता ब्लास्टिंगच्या कामाला सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने मोठे दगड फोडल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने त्यांचा मलबा बाजूला करण्यात आला.

शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या ब्लास्टिंग आणि दगड हटविण्याच्या मोहिमेनंतर सायंकाळी ४.३० वाजता रघुवीर घाटातील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. तब्बल ४० तासांनंतर वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालक, विद्यार्थी, नोकरदार आणि परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील आणि शाखा अभियंता निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी पावसाळ्यात घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे वाहनचालकांनी घाटातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी तसेच प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तब्बल ४० तासांचा अडथळा दूर करून रघुवीर घाट पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाल्याने सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील जनजीवन पुन्हा सुरळीत झाले आहे.


माणुसकीचे दर्शन; आरावच्या ग्रामस्थांनी केली चालक-वाहकांची व्यवस्था

रघुवीर घाटातील दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचा फटका आकल्पे गावाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही बसला. गुरुवारी खेडहून आकल्पेकडे गेलेले एक वाहन दरड हटविण्यात न आल्याने परत येऊ शकले नाही.

वाहनातील चालक आणि वाहक अडकून पडल्याची माहिती मिळताच आराव येथील ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडविले. ग्रामस्थांनी दोघांची दोन दिवस अन्न, पाणी तसेच राहण्याची व्यवस्था करून त्यांना मोठा आधार दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button