
विद्यार्थी, प्रवाशांचे हाल; सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांची यांच्याकडून तात्काळ दखल
गुहागर : गुहागर आगारातून वाहकांनी मुंबई – पुणे येथे सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीला जेवणासाठी हॉटेल थांबा नसल्याने तसेच कारवाई होत असल्याने रिबुक होण्यास नकार दिल्याने गाडी सुटत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशी यांची गुहागर डेपोत तुफान गर्दी झाली होती. बराच वेळ गेल्याने उपासमारही झाली होती. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ दखल घेत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे आणि सहकारी यांनी धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक, तसेच रत्नागिरी विभाग नियंत्रक यांच्याकडे आगारातूनच दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि प्रशासन व वाहक यांच्यात योग्य तो समन्वय साधून लांब पल्ल्याच्या गाडीला हॉटेल जेवण थांबा मिळवून देण्याची मागणी केली. तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, ती कारवाई स्थगित करण्याचे लेखी पत्र घेऊन यशस्वी शिष्टाई करत तब्बल पाच तास गुहागर आगारातून ज्या गाड्या सुटत नव्हत्या त्या सुटेपर्यंत सर्वजण गुहागर आगारात ठाण मांडून होते. गाड्या आगारातून सुटल्यावर विद्यार्थी, प्रवाशी यांची योग्य ती सोय झाल्यानंतरच सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुहागर आगार सोडले.
सभापती आणि उपसभापती या दोघांच्याही विषय तत्काळ मार्गी लावण्याच्या कार्यपद्धतीबद्दल विद्यार्थी, प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.




