
रत्नागिरीत धक्कादायक प्रकार! गोवंश कत्तलीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; पनवेलच्या दोघांना ताब्यात
फणसवळेच्या जंगलात कथित बेकायदेशीर कत्तलीचा प्रकार; एक संशयित फरार, ग्रामस्थांमध्ये संताप
रत्नागिरी तालुक्यातील मधलीवाडी-फणसवळे परिसरातील जंगलात कथित बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाच संशयितांनी विरोध करत हुज्जत घालून हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पनवेल येथील दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, एक संशयित पसार झाला आहे.
फणसवळे येथील जंगलाच्या आडोशाला हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना पाहताच संशयितांनी कारवाईला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांशी हुज्जत घालत परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी संशयितांकडून पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती असून, पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर एक जण घटनास्थळावरून पसार झाला. फरार संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, फणसवळे परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, बेकायदेशीर कत्तलीच्या प्रकारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




