
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील मांडकी प्रादेशिक नळपाणी योजनेला विजेच्या समस्येचा फटका
चिपळूण तालुक्यातील मांडकी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून सहा गावांना सुरळीत पाणीपुरवठा करीत आहे. मात्र, सध्या योजनेच्या पंपासाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी पंप ऑपरेटर अनंत पवार व त्यांच्या सहकारी कर्मचार्यांनी केली आहे.
मांडकी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सन २००१ पासून सहा गावांमध्ये कार्यरत आहे. या योजनेची विहीर व पंप असुर्डे येथील निर्मलवाडी परिसरात आहे. पंप सुरू करण्यासाठी वीज आवश्यक असताना दिवसातून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत. परिणामी संबंधित गावांमधील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.




