
अनिरुद्ध शेखर निकम यांची ‘यूथ एम्पॉवरमेंट फोरम २०२६’साठी निवड
जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहभागातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा मंचात जगभरातील १०० युवा सहभागी होणार
चिपळूण : जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे ३ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘यूथ एम्पॉवरमेंट फोरम २०२६’साठी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध शेखर निकम यांची निवड झाली आहे. या आंतरराष्ट्रीय युवा मंचामध्ये जगभरातील सुमारे १०० युवा सहभागी होणार आहेत.
युनायटेड नेशन्स आणि सेंटर फॉर ग्लोबल डायलॉग अँड लीडरशिप यांच्या आयोजनातून हा आंतरराष्ट्रीय मंच होत आहे. या फोरमदरम्यान युनायटेड नेशन्स मुख्यालय, जिनिव्हा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तसेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन येथे संस्थात्मक व अभ्यासभेटी आयोजित करण्यात आल्या आहेत. यासह विशेष ब्रीफिंग आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवादाची संधीही सहभागी युवकांना मिळणार आहे.
फोरममध्ये ‘लीडरशिप अँड स्किल बिल्डिंग’ तसेच ‘ह्युमॅनिटेरियन डिप्लोमसी’ या विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ‘यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ग्रँट पिच कॉम्पिटिशन’ही होणार आहे. या माध्यमातून युवा सक्षमीकरण, जागतिक धोरण, शाश्वत विकास, कामगार धोरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण या विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादाची संधी उपलब्ध होणार आहे.
कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनाचा अनुभव
अनिरुद्ध निकम यांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेतून मराठी माध्यमातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सह्याद्रि कृषी महाविद्यालयातून कृषी विषयातील पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील जागतिक क्रमवारीतील ४०व्या मानांकित ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड’मधून २०२२ ते २०२४ या कालावधीत एम.एस्सी. अॅग्रिकल्चर ही पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
शिक्षणासोबत त्यांनी ऑस्ट्रेलियन क्वीन्सलँड डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर अँड फिशरीजसोबत कृषी संशोधन क्षेत्रात काम केले आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या ‘ट्रॉपिकल फ्रूट रॉबस्टनेस अँड पोस्ट-हार्वेस्ट मॅनेजमेंट’ या प्रकल्पाशी संबंधित संशोधनात त्यांनी योगदान दिले आहे.
त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याची दखल घेत क्वीन्सलँड सरकार आणि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड यांच्या वतीने डिसेंबर २०२४ मध्ये त्यांना ‘डीनस् कमेंडेशन अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
क्रीडा, सामाजिक व संस्थात्मक क्षेत्रात सक्रिय
अनिरुद्ध निकम हे चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष असून, क्रीडा, सामाजिक, ग्रामीण विकास आणि युवा उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत.
शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदान, आंतरराष्ट्रीय अनुभव, संस्थात्मक नेतृत्व तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभागाची दखल घेऊन अनिरुद्ध निकम यांची ‘यूथ एम्पॉवरमेंट फोरम २०२६’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युवा मंचासाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले आहे.




