
मुंबई-गोवा महामार्गावरील लवेलजवळ भरधाव मोटारीची दोन अल्पवयीन तरुणींना धडक; पाच जण जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल पेट्रोल पंपासमोर रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भरधाव टाटा पंच मोटारीने रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोन अल्पवयीन तरुणींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोटार रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली.
या अपघातात लवेल येथील यास्मिन निजाम पटाईत (१४) आणि मानसी केसवन शर्मा (१४) या दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या. तसेच मोटारीतील एक महिला व दोन पुरुष जखमी झाले असून, एकूण पाच जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मोटारीचे मोठे नुकसान झाले असून, काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.




