भटकी गुरे आणि औद्योगिक क्रांतीची संधी!

✒️अभिजित हेगशेट्ये

गाई पाण्यांवर काय म्हणूनी आल्या ही कवी ”बी ” यांची कविता इयत्ता सातवीच्या पुस्तकात असणारी, श्रीधर फडके यांनी गायलेले गाणे आपल्या प्रत्येकाच्या मनामनात गुंजणारे. यांतील गाई पाण्यावर हा शब्दातून बाप आपल्या मुलीच्या निरागस मनातील भावभावनांचा अर्थ शोधणारा. बाहेरील पाणवठ्याचे दृष्यआणि आतील भाव-भावनांचे विश्व यांना जोडण्याचे काम कवी करतो. मानवी जीवनाच्या भावनांशी प्रेमाने जोडलेले हे गोचरांचे नाते आज इतके कठोर का झाले ? असा प्रश्न रत्नागिरी शहराच्या रस्त्या रस्त्यावरील पहूडलेली गोचरांची झुंड पाहून होत आहे.

रत्नागिरी शहरात आज मोकाट गुरांचा जणू उच्छाद व्हावा अशी भयाण अवस्था आहे. शहरातील प्रत्येक भागातील रस्ता या मोकाट गुरांनी व्यापला आहे. नागपूर –मिऱ्या या अत्यंत अद्ययावत विस्तीर्ण होत असलेल्या महामार्गावर जेके फाईल्स ते हातखंबा मोकाट गुरांचे जथे बसलेले असतात. यांची संख्या इतकी मोठ्या संख्येने वाढत आहे की, अनेकवेळा वाहन चालकांना पुढे जाण्यासाठी मार्गच नसतो. यामुळे ट्रॅफीक जाम ची समस्या सुरु होते. यातून अनेक अपघात होतात. दुचाकी वाहनचालकांचे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. काहीवेळा ही मोकाट गुरे अचानक आवेशपुर्ण उत्तेजीत होतात, त्यांच्या झुंझी लागतात त्यावेळी कोणते वाहन त्याचा बळी होईल याचा भरवसा नाही. यांतून त्या जनावरांनाही मोठ्या प्रमाणावर दुखापती होतात. ती फॅक्चर होतात.

सध्या रत्नागिरी शहर स्मार्ट सीटी म्हणून वेगाने विकसीत होत आहे. अद्ययावत सीमेंट कॅांक्रिट रस्ते, नव्याने बदलले जाणारे डीव्हायडर तेथील वृक्षवल्ली, गार्डनस, नव-नव्या आकर्षक महागड्या शोभेच्या झाडांचे प्लॅंटेशन, नव्याने उभी रहाणारी लॅान्स, या सौदर्यावर मोकाट कुत्रे आणि भटकी गुरे यांचे आक्रमण म्हणजे शहराच्या सौदर्यीकरणारवर असणारे आक्रमणच आहे. पुर्वीही मोकाट गुरे होती. परंतू ऊन जसे वाढतजाई तशी डांबर वितळून त्यांना चटके बसत आणि ती निघून जात, मात्र काँक्रीट रस्ते त्यांना अधिकच उबदार वाटत असणार त्यामुळे या गोमाता आणि त्यांची नुकतीच जन्मलेली वासरे कितीही मोठा ट्रक आला वाहनांनी कर्कश हॅार्न वाजवत आक्रोश केला तरी त्याला दाद न देता ढीम्म बसून रहातात. यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या गुरांना आणखी एक हक्काची जागा मिळाली आहे ती रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील विस्तीणे रेल्वे स्टेशन, रस्ते आणि प्लॅटफार्म हे त्यांचे हक्काचे ठीकाण झाले आहे. तेथील डस्टबीम मध्ये तोंड खूपसून ते कचरा खाण्यापर्यत त्यांची मजल गेली आहे. खरं तर गाई बैल यांच्या पोटात प्लॅस्टीक कचरा जाऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था कार्यरत होत्या बहूदा आज त्यांना शेकडो गुरांना कंट्रोल करणे जमत नसावे. काही सामाजिक कार्यकर्ते निवडणूक काळात या गुरांच्या गळ्यात रिफ्लेक्शन पट्टे बांधत होते. तेही कमी पडू लागले. रत्नागिरीचे रस्ते रोज शेणाने सारवण्याचे काम मात्र ही शेकडो गुरे करत असतात ही त्यातील जमेची बाजू मानावी लागेल.

या प्रश्नाकडे रत्नागिरी नगरपरिषद गांर्भीयाने पहात आहे याची अनुभूती वारंवार येत असते. चंपक मैदान हे आमचे हक्काचे ठिंकाण आहे. तेथे फार मोठ्या जागेत मोकाट गुरांना रहाण्यासाठी व्यवस्था केल्याचे वारंवार सांगितले जाते. परंतू मोकाट गुरेच इतकी आहेत की त्यांचा ही इलाज चालत नसावा. आज रत्नागिरी शहर आणि परिसरात जवळपास १००० पेक्षा अधिक मोकाट गुरे आहेत. खरं तर हे या शहराचे गोधन आहे. अनमोल संपत्ती आहे. अस्मिता आहे. या गोधनाकडे सकारात्मक औद्योगिक क्रांतीचे प्रेरक म्हणून पाहिल्यास या शहरातील तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी मिळू शकतात. सध्या प्रत्येकाच्या बोलण्यात बेकारी, बेरोजगारी, उद्योग नोकरी नाही हे प्रश्न आहेत. त्यासाठी या संधीचा उपयोग करता येऊ शकतो याचा विचार नगरपरिषदेने करणे गरजेचे आहे.

गोशाळा हा त्यावरील उत्तम मार्ग आणि शेकडोंच्या रोजगाराच्या संधीचा मार्ग आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या यासाठी विविध योजना आहेत. त्या अंतर्गत १५ लाखापासून २ कोटी पर्यंत अनुदान मिळू शकते. प्रत्येक गोशाळेत १०० जनावरे असा जरी हिशेब केला तरी दहा ते पंधरा गोशाळा रत्नागिरीत उभ्या राहू शकतात. याला विशेष निधी म्हटला तरी २५ कोटीचा निधी शासनाकडून रत्नागिरीत येईल. एक गाय सांभाळण्यासाठी प्रतिदिनी शासन ५०/- रूपये देते याचा अर्थ रत्नागिरीतील या गोशांळांना प्रतिदिन २५ ते ३० लाखाचे अनुदान म्हणजे वर्षाला शंभर कोटीचे अनुदान फक्त गुरांना सांभाळण्यासाठी मिळेल. १०० कोटीची वार्षीक अनुदान म्हणजेच पुढील दहा वर्षात १००० ते १५०० कोटीचे अनुदान हा मोठा औद्योगिक प्रकल्प आणि शेकडो तरुणांना रोजगार ठरु शकतो. त्या सोबत ॲनसलरी इडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येऊ शकते. यांत अनेक गाई नुकत्याच व्यालेल्या आहेत. त्यांचे दुध त्यातही गावठी गाईचे दुध आज दुरापास्त झाले आहे. ते किमान १५० रुपये लीटरने जाऊ शकते. काही गीर जातीच्या उत्तम गाई या कळपात दिसतात त्यांच्या दुधाला मोठा मागणी आहे.

सध्याच्या नवा फिटनेस ट्रेंड हा गोमुत्र प्राशन त्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांचा रोजच्या जीवनातील वापर वाढत आहे. त्यामुळे त्यापासून बनणारे साबण, कॅास्मेटीक्स यांला मोठी मागणी आहे. तसेच गाईचे ओरीजनल शेण त्यापासून बनविली जाणारी अगरबत्ती काही फेशिअल क्रीम अत्यंत प्रसिध्द आहे. तिला आज अमेरीका युरोप येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील बहूतांश कुंटुंबातील अमेरिका युरोपमध्ये असणारी युवा पिढी यासाठी मोठा ग्राहक आहे. त्याला औद्योगिक दर्जा दिल्यास अनुदान दिल्यास त्यातून काही कोटींची आर्थिक उलाढाल होणारी उद्योग उभा राहू शकेल. यासाठी लागणारा चारा जरी कोल्हापूर भागातून मागविला तरीही शेकडो कोटीची उलाढाल आणि जवळपास हजारो मुलांना रोजगारीची संधी तिही आपल्याच शहरात मिळेल. आज प्रत्येक मुल जिल्ह्याबाहे रोजगारासाठी जात आहे. हे स्थलांतर थांबेल. त्यामुळे या भटक्या गुरांचा तिरस्कार करु नका , त्यांना अडचण, अढथळे मानू नका तर ती आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग म्हणून रत्नागिरी शहराच्या स्मार्ट सीटीचा भाग म्हणून स्वीकारा. आणि औद्योगिक क्रांतीचे जनक होऊ शकतात याचा विचार करा.

गोचर राखा, गवत उगवू द्या, पुन्हा त्यांना मोकळी वाट! भटकी गुरे असतील तरच माणुसकीची, रोजगाराची उगवे पहाट!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button