
मुंबईत गणेश आगमनाच्या मिरवणुकांचा जल्लोष; आगमन सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी; रस्त्यांवर वाहतूक कोंडी!
मुंबई : ढोल-ताशांचा गजर, गुलाल – फुलांची उधळण आणि ‘गणपती’च्या जयघोषात शनिवारी विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे जल्लोषात आगमन झाले. सुमारे २५ हून अधिक गणेश मंडळांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. तसेच काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांना ताटकळत प्रवास करावा लागला.
गणेशोत्सवाला अद्याप काही दिवस शिल्लक असले तरी गणेशमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाल्याने मुंबईच्या रस्त्यांवर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशमूर्ती साकारणाऱ्या गणेश कार्यशाळांच्या परिसरात शनिवारी सकाळपासूनच भक्तांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली. गणेशमूर्ती ट्रॉली, वाहनावर विराजमान केल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात करण्यात येत होती.
परळचा राजा, परळचा महाराजा, चिंतामणी या प्रसिद्ध मंडळाच्या गणपतींसह अन्य मंडळाच्या गणेशमूर्तींचेही जल्लोषात आगमन झाले. गणेशाच्या दर्शनासाठी आणि आगमन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः गणेश कार्यशाळांच्या परिसरात दुपारनंतर भाविकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण मिरवणुकीत सहभागी झाले होते.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने लालबाग, परळ आणि आसपासचा परिसर दुमदुमला. आगमन सोहळ्याच्या निमित्ताने वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अनेक ठिकाणी मार्ग वळविण्यात आले होते. भोईवाडा विभागातील परेल वर्कशॉप, बी ए रोड, परेल मुंबई येथून सी.एस.एम.टी. कडे जाणारी दक्षिण आणि उत्तर वाहिनीवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राम मंदिर ते रफी अहमद किडवाई चार रस्ता – गोविंद धोंडू आंबेडकर रोड आणि उत्तर वाहिनीवर बी के रोड – बावला कंपाऊंड ते बॅरिस्टर रोड ते रफी अहमद किडवाई चार रस्ता अशी वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र तरीही अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, लालबाग – परळ परिसरात शनिवारी संध्याकाळपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती. रविवार, ३० ऑगस्ट रोजीही अनेक मंडळाच्या गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारीही मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या शनिवारी भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रविवार अनेक मंडळांनी गणेश आगमन मिरवणुका रद्द केल्या होत्या. पुढील शनिवारी दहीहंडी उत्सव आहे. त्यामुळे रविवार, ३० ऑगस्ट रोजी ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
भुलेश्वर दुर्घटनेनंतरही जल्लोष सुरूच
मागील आठवड्यात ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत गणपतीची मूर्ती कोसळून मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अन्य गणेश मंडळांनी गणपतीच्या आगमन मिरवणुकांमध्ये वाजंत्रीचा वापर करू नये. तसेच इतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा न करता गणपतीच्या मूर्तीचे स्वागत करावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले होते. मात्र, अनेक मंडळांनी समितीच्या या आवाहनाला बगल दिल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.



