
गणेशोत्सवात कोकण प्रवास महागणार; खासगी बसचे भाडे ४ ते ५ हजारांवर!
रेल्वे आरक्षण फुल्ल; एसटीला मोठी मागणी, खासगी बसचालकांकडून प्रवाशांची आर्थिक कोंडी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांची लगबग सुरू झाली असून, रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण मोठ्या प्रमाणात फुल्ल झाल्याने प्रवाशांसमोर एसटी आणि खासगी बसचा पर्याय उरला आहे. मात्र, खासगी बसने कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना यंदा तब्बल ४ ते ५ हजार रुपये मोजावे लागणार असल्याने गणेशोत्सवाचा प्रवास चांगलाच महागणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून सुमारे १२ ते १३ लाख चाकरमानी कोकणात दाखल होतात. या काळात सुमारे तीन ते साडेतीन हजार खासगी बसेस कोकणच्या दिशेने धावतात. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन खासगी बसच्या भाड्यात वाढ केली जाते. एसटीच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारण्यास खासगी बसला परवानगी असली तरी प्रत्यक्षात अनेक मार्गांवर त्यापेक्षा अधिक दर आकारले जात असल्याचे चित्र आहे.
एरवी सुमारे एक हजार रुपये असलेले तिकीट गणेशोत्सवाच्या काळात थेट ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कुटुंबासह कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
रेल्वेने १ लाख १३ हजारांहून अधिक प्रवाशांचे आरक्षण
गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १३ हजार ४२८ प्रवाशांनी आरक्षण केले असून, रेल्वेला त्यातून ७.७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मध्य रेल्वेकडून २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत २०० विशेष आरक्षित आणि ६२ अनारक्षित फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. आतापर्यंत आरक्षित गाड्यांमधून १ लाख १० हजार ५२३ प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली असून, त्यातून ६.२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. पश्चिम रेल्वेकडून ७ ते २६ सप्टेंबरदरम्यान ५४ आरक्षित विशेष फेऱ्या चालविण्यात येणार असून, आतापर्यंत २ हजार ९०५ प्रवाशांनी आरक्षण केले आहे.
एसटीच्या समूह आरक्षणाला पसंती
चाकरमान्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने यंदा तब्बल ५२०० गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६१२ एसटी गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी ३८७ गाड्या समूह बुकिंगच्या आहेत.
१२ आणि १३ सप्टेंबर रोजी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक अपेक्षित आहे. त्यामुळे ११ आणि १२ सप्टेंबरच्या एसटी गाड्यांना मोठी मागणी असून, या तारखांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण होत आहे.
रेल्वेचे आरक्षण मिळाले नाही तर प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे एसटीच्या समूह आरक्षणालाही मोठी पसंती मिळत आहे.
१२ सप्टेंबरला खासगी बसचे संभाव्य भाडे
मार्ग| संभाव्य भाडे
मुंबई–सिंधुदुर्ग| ४ हजार रुपये
मुंबई–कुडाळ| ३ ते ३.५ हजार रुपये
मुंबई–कणकवली| ३ ते ४ हजार रुपये
मुंबई–सावंतवाडी| ४ ते ४.५ हजार रुपये
दरम्यान, गणेशोत्सवाच्या कालावधीत खासगी बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या दररोज सुमारे १३० खासगी बस कोकणात जात असून, गणेशोत्सव काळात ही संख्या सुमारे ३५० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. एसटीच्या दीडपट भाडे आकारण्यास खासगी बसला परवानगी असल्याने त्यानुसार भाडे निश्चित केले जाईल, अशी माहिती मुंबई बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक यांनी दिली.
रेल्वेचे आरक्षण मिळण्यास अडचण येत असल्याने अनेक प्रवासी आतापासूनच एसटी आणि खासगी बसचे आरक्षण करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकण प्रवासासाठी चाकरमान्यांना यंदा मोठा आर्थिक भार सहन करावा लागण्याची शक्यता आहे




