
चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात सफाई कामगार व फार्मासिस्ट पदे भरण्याची मागणी
सफाई कामगाराची बदली न करता त्यांना मूळ ठिकाणी हजर करण्याची मागणी; फार्मासिस्ट पद वर्षभरापासून रिक्त
रत्नागिरी : चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने सफाई कामगार आणि औषध निर्माणशास्त्र (फार्मासिस्ट) पद तात्काळ भरण्याची मागणी पंचायत समिती सदस्य संयोग संजीव दळी यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत २८ ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दळी यांनी म्हटले आहे की, चांदोराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोमल पवार या सफाई कामगार म्हणून जवळपास वर्षभरापूर्वी हजर झाल्या आहेत. मात्र, हजेरी मस्टरवर त्यांची नोंद असून त्या जिल्हा कार्यालयात सेवा बजावत असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना तात्काळ चांदोराई प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
चांदोराई प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एकमेव सफाई कामगार कार्यरत असून त्या आठ तास सेवा बजावत आहेत. या केंद्रातील ओपीडीची संख्या दररोज २०० पेक्षा अधिक असून प्रसूती, कुटुंब नियोजनाच्या केसेस तसेच छोटी-मोठी शस्त्रक्रिया होत असतात. त्यामुळे आरोग्य केंद्रासाठी कायमस्वरूपी पूर्णवेळ सफाई कामगाराची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, चांदोराई प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माणशास्त्र (फार्मासिस्ट) हे एक पद सुमारे वर्षभरापासून रिक्त असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर लिहून दिलेली औषधे सध्या इतर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना दिली जात असल्याचे दळी यांनी पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे सफाई कामगारास तात्काळ मूळ कार्यस्थळी हजर करून तसेच फार्मासिस्टचे रिक्त पद तातडीने भरून चांदोराई प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करावी, अशी मागणी संयोग संजीव दळी यांनी केली आहे.




