चालणे की पोहणे? पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम बेस्ट, वाचा..

Swimming or Walking : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत फिट राहणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अशा वेळी चालणे आणि पोहणे हे व्यायामाचे सोपे पर्याय ठरतात. हे दोन्ही प्रकार वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात; पण प्रश्न असा उपस्थित होतो की, नक्की कोणत्या व्यायाम प्रकारात जास्त कॅलरीज बर्न होतात? याचविषयी सविस्तर जाणून घेऊ..

आजच्या व्यस्त आयुष्यात स्वतःला फिट ठेवणे सोपे राहिलेले नाही. काम, घर आणि रोजच्या जबाबदाऱ्यांमुळे प्रत्येकालाच जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळतोच असे नाही. अशा वेळी चालणे आणि पोहणे हे फिटनेसचे सोपे पर्याय बनू शकतात. हे दोन्ही व्यायाम शरीराला सक्रिय ठेवण्यासह वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. परंतु, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर चालणे आणि पोहणे यापैकी कशात जास्त कॅलरीज जळतात, असा प्रश्न पडणे साहजिक आहे.

चालणे हे रोजच्या जीवनशैलीत सहज समाविष्ट केले जाऊ शकते, तर पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा एकाच वेळी व्यायाम होतो. अशा वेळी फक्त कॅलरीजच नाही, तर तुमची रोजचे रुटीन, वेळ आणि आवड या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. चला तर मग जाणून घेऊया की या दोन्हीपैकी कोणता पर्याय तुमच्या जीवनशैलीसाठी अधिक योग्य ठरू शकतो.

चालण्याने किती कॅलरीज खर्च होतात?

एका अहवालानुसार, साधारण ७० किलो वजन असलेली व्यक्ती जर सामान्य वेगाने एक तास चालली, तर सुमारे २८० ते ३५० कॅलरीज खर्च होऊ शकतात. जर तुम्ही वेगाने चाललात किंवा चढउताराच्या रस्त्यावर चाललात, तर ही संख्या जवळपास ४०० कॅलरीजपर्यंत पोहोचू शकते.

पोहण्यामध्ये जास्त मेहनत का लागते?

पोहताना शरीराला पाण्याच्या दाबाविरुद्ध सतत काम करावे लागते. यामुळे हात, पाय, खांदे आणि पोट यांसह शरीराचे अनेक स्नायू एकाच वेळी सक्रिय होतात. याच कारणामुळे चालण्याच्या तुलनेत पोहण्यामध्ये जास्त कॅलरीज खर्च होऊ शकतात.

एका तासाच्या पोहण्याने किती कॅलरीज खर्च होतात?

सुमारे ७० किलो वजन असलेली व्यक्ती पोहण्याचा वेग आणि प्रकार यानुसार एका तासात साधारण ४०० ते ७०० कॅलरीज खर्च करू शकते. संथ गतीने पोहल्यास कमी कॅलरीज खर्च होतील, तर वेगाने पोहल्यास जास्त मेहनत लागेल आणि जास्त कॅलरीज जळतील.

मग चालणे हा उत्तम पर्याय का आहे?

चालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणताही माणूस हा व्यायाम सहज सुरू करू शकतो. यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची किंवा खास जागेची गरज नसते. रोज ३० ते ४५ मिनिटे चालणे तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत सहज समाविष्ट करू शकता.

पोहण्याचा एक मोठा फायदा

पोहताना शरीराचे अनेक भाग एकाच वेळी काम करतात. त्यामुळे हा संपूर्ण शरीराचा (फुल बॉडी) एक उत्तम व्यायाम ठरतो. पाणी शरीरावर कमी ताण टाकते, त्यामुळे ज्यांना सांध्यांवर जास्त ताण देणारे व्यायाम आवडत नाहीत किंवा त्रास होतो, त्यांच्यासाठी पोहणे खूप उपयुक्त ठरू शकते.

शेवटी दोन्हीपैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?

वजन कमी करण्यासाठी फक्त एका तासात कोण जास्त कॅलरीज खर्च करतो हे पाहणे योग्य नाही. खरी मदत त्या व्यायामाने होईल जो तुम्ही नियमितपणे करू शकता. जर तुम्हाला रोज सहज व्यायाम करायचा असेल तर चालणे हा चांगला पर्याय आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला पोहण्याची आवड असेल आणि स्विमिंग पूलची सोय उपलब्ध असेल, तर पोहणे हा जास्त फायदा देणारा व्यायाम ठरू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button