
२८८ भारतीय बेपत्ता; नेपाळमध्ये पुरामुळे ३९२ जणांचा मृत्यू!
नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी पुरामुळे २८८ भारतीय बेपत्ता असून २०० जण तिबेटमध्ये अडकल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सातत्याने दोन्ही देशांच्या अधिकार्यांच्या संपर्कात असून पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांची स्थिती आणि सुरक्षिततेची माहिती घेण्यात येत आहे.
हिमस्खलनामुळे तिबेट व नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरामुळे एकूण ३९२ जणांचा मृत्यू झाला असून १५०० बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये पूल, रस्ते, जलविद्युत प्रकल्पांसह वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून हिमालयातील या देशात बचावकार्याला वेग आला आहे. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय अडकल्याने त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नेपाळ व चीनमधील भारताच्या राजदूतांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांची स्थिती आणि सुरक्षिततेची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकार तातडीचे प्रयत्न करत आहे, असे एस. जयशंकर यांनी सांगितले. बुधवारी रात्रीपासून भारताने लष्करी विमानांद्वारे नेपाळला एकूण ४७.५ टन आपत्कालीन मदत सामग्री पाठवली आहे आणि आणखी मदत साहित्य पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती परराष्ट्र विभागातील अधिकार्यांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये जलविद्युत प्रकल्पांवर काम करणारे कामगार आणि तमिळनाडू व पश्चिम बंगालसह विविध राज्यांतील पर्यटकांच्या गटांचा समावेश आहे. आतापर्यंत २८८ भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामध्ये ‘त्रिशुली वन’ ऊर्जा प्रकल्पावर काम करणार्या ७३ जणांचा समावेश आहे. काठमांडू येथील भारतीय दूतावास या प्रकल्पाच्या प्रमुखांच्या सातत्याने संपर्कात आहे.
तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील १०६ जण मानसरोवर यात्रेसाठी गेले आहेत. त्यापैकी २१ जणांची सुटका करण्यात आली आली आहे. पश्चिम बंगालमधील ३२ तर केरळममधील ३३ भारतीय नागरिकांचा एक स्वतंत्र गट रसुवा जिल्ह्यातील तिमुरे येथे गेला होता, तर इतर राज्यांतील ६१ भारतीयांचा आणखी एक गटही तिथे गेल्याचे जैस्वाल यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांत अतिदक्षता : नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर या जिल्ह्यांत अतिदक्षता बाळगण्यात आली आहे. नेपाळमधून येणार्या नद्यांच्या (विशेषत: गंडक) प्रवाहावर आणि जलस्रोतांवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मदत कक्ष, संपर्क क्रमांक
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी सरकारने मदत कक्ष सुरू केला आहे. मदतीसाठी राज्य नियंत्रण कक्षाचा १०७० हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध असून, ९१-९३२१५८७१४३ यावर संपर्क साधता येईल. controlroom@maharashtra. gov. in या ई-मेलवर माहिती देता येणार आहे.
महाराष्ट्रातील ८०पेक्षा अधिक पर्यटक अडकले
नाशिक : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ८०पेक्षा अधिक पर्यटक, भाविक अडकल्याचा प्राथमिक अंदाज असून आतापर्यंत त्यातील चार जणांशी संपर्क झाला आहे. मानसरोवर यात्रेत राज्यातील काही पर्यटक गेले असून त्यांची संख्या स्पष्ट झालेली नाही. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना आपापल्या भागातून नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




