
रक्षाबंधनाच्या दिवशीच काही भागातील रत्नागिरीकरांची पाण्यासाठी वणवण!
कमी दाबाने पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; शिळ येथे वीज नसल्याचे कारण, ‘महाकाय जनरेटर’ कुठे गेला?
रत्नागिरी : रक्षाबंधनासारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी रत्नागिरी शहरातील काही भागांत नगर परिषदेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. शिळ येथे वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कारण नगर परिषदेकडून देण्यात येत आहे.
मात्र, काही वर्षांपूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगर परिषदेने मोठ्या क्षमतेचा जनरेटर खरेदी केला होता. मग सणाच्या दिवशी निर्माण झालेल्या या परिस्थितीत त्या जनरेटरचे अस्तित्व आणि उपयोग काय, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सणासुदीच्या काळात पाण्याची गरज अधिक असताना पाणीपुरवठ्यात अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र, त्याबाबत योग्य त्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशीच अनेक नागरिकांना पाण्याची जुळवाजुळव करावी लागल्याने नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सणाच्या दिवशी नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने आधीच योग्य नियोजन का केले नाही? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
सणाच्या काळातही पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेबाबत नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल, तर नगर परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या प्रकाराची दखल घेऊन भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस नियोजन करण्याची मागणी होत आहे.




