चिपळूणचे मुलांचे शासकीय वसतिगृह लवकरच बी एस एन एल इमारतीत – समाज कल्याण विभागाची माहिती


रत्नागिरी, दि २७ ) – चिपळूण येथील ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह’ कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले नसून, येत्या एक ते दोन महिन्यांत ते पर्यायी इमारतीत पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी दिली आहे.
वसतिगृहासाठी चिपळूण, खेर्डी येथील BSNL निवासी कॉलनीच्या इमारतीचा पर्याय निवडण्यात आला आहे. १२ ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांनी या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. या इमारतीच्या आवश्यक दुरुस्तीचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) मागवण्यात आले असून, ते मिळताच इमारत भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
वसतिगृह तात्पुरते बंद ठेवण्याचे कारण

  • चिपळूणमध्ये स्वतःची शासकीय जागा नसल्याने हे वसतिगृह भाड्याच्या जागेत सुरू होते.
  • जुन्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे आणि दुरुस्तीच्या अभावामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटून २०२३-२४ मध्ये ७५ पैकी केवळ ३ वर आली होती.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जून २०२४ मध्ये हे वसतिगृह तात्पुरते स्थगित करण्यात आले.
    विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ
    वसतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत अर्ज केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’चा लाभ दिला जात आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान किंवा गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही विभागाने दिली आहे.
    इमारत मालकांना आवाहन
    चालू शैक्षणिक वर्षात चिपळूण किंवा नजीकच्या परिसरात ७५ विद्यार्थी क्षमतेची सुरक्षित व सुयोग्य इमारत उपलब्ध असल्यास संबंधित इमारत मालक किंवा संस्थांनी समाज कल्याण विभागाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button