
शासकीय कामांची बिले रखडल्याने आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या; सात कंत्राटदारांनी आतापर्यंत जीवन संपवले!
मुंबई : शासकीय कामे पूर्ण करूनही दीर्घकाळ बिले मिळत नसल्याने राज्यातील छोट्या-मोठ्या शासकीय कंत्राटदारांवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा कंत्राटदारांच्या संघटनांनी केला आहे.
या आर्थिक विवंचनेतून नवी मुंबईतील गजानन देवकते या शासकीय कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. शासकीय कामांची बिले वेळेत न मिळाल्याने कंत्राटदार आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत सात शासकीय कंत्राटदारांनी आत्महत्या केली आहे.
यापूर्वी सांगलीतील अभियंता हर्षल पाटील, नागपूर येथील अनुप वर्मा तसेच जळगावमधील विनोद राठोड यांनीही शासकीय कामांची बिले रखडल्याने आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा दावा कंत्राटदारांच्या संघटनेने केला आहे. आतापर्यंत राज्यात सात शासकीय कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. राज्यात सुमारे तीन ते चार लाख छोटे-मोठे शासकीय कंत्राटदार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि अन्य विभागांमार्फत ही मंडळी विविध विकासकामे घेतात. स्थानिक पातळीवरील रस्ते, पाणीपुरवठा, इमारती, लघु सिंचन आणि अन्य कामे पूर्ण करून त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर कामांच्या आदेश मिळाल्यानंतर कंत्राटदारांनी स्वतःची भांडवली गुंतवणूक करून कामे पूर्ण केली. त्यानंतर संबंधित कामांची बिले मोठ्या प्रमाणावर रखडली असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. काही बिले दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचेही कंत्राटदारांचे म्हणणे आहे. शासनाच्या विविध योजनांवरील वाढता आर्थिक भार आणि निधीअभावी देयके रखडत असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. थकीत बिलांच्या प्रश्नावर कंत्राटदारांच्या संघटनांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. नुकतेच आझाद मैदान परिसरातही आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या माहितीनुसार, राज्य शासनाकडे कंत्राटदारांची तब्बल ८६ हजार कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत.
शासनाकडून मोठी कामे मोजक्या कंत्राटदारांना एकत्रित देऊन छोट्या कंत्राटदारांना व्यवसायातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शासकीय कंत्राटदार कामगार संघटनेचे नेते अभियंता मिलिंद भोसले यांनी केला आहे. राज्यातील लाखो कंत्राटदारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रलंबित बिले तातडीने अदा करावीत, गजानन देवकाते यांच्या आत्महत्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.




