गुहागर-चिपळूण सीमेवर अवघड वळणावर अवजड ट्रेलर अडकला; वाहतूक ठप्प


सावर्डे पोलिसांच्या तत्परतेने काही तासांनंतर वाहतूक पूर्ववत


गुहागर-चिपळूण तालुक्यांच्या सीमेवरील केरे हद्दीत अवजड स्टील साहित्याची वाहतूक करणारा भलामोठा ट्रेलर अवघड वळणावर अडकल्याने काही तास वाहतूक विस्कळीत झाली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गुहागर तालुक्यातील तवसाळ येथून श्रीवर्धनच्या दिशेने स्टीलचे साहित्य घेऊन जाणारा अशोका कंपनीचा हा ट्रेलर कापशी पुलापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील चढणीच्या अवघड वळणावर अडकला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने तसेच चढण आणि वळण कठीण असल्याने ट्रेलर पुढे सरकू शकला नाही.

अवजड ट्रेलर रस्त्याच्या मध्यभागीच अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना काही तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अडकलेला ट्रेलर बाजूला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अखेर ट्रेलर हटवण्यात यश आल्याने काही तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी आबलोली येथील पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी वाहतूक कोंडी टळली असून, मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button