खांब तळ्याच्या सुशोभीकरणाला गती; महिनाभरात काम सुरू करण्याचे ना. योगेश कदम यांचे निर्देश

खेड : शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या खांब तळे सुशोभीकरण प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. किशोरजी विठोबा कानडे क्रीडांगणासमोरील ऐतिहासिक खांब तळ्याचा कायापालट करून येथे अत्याधुनिक ‘वॉटर म्युझिक विथ लेझर फाऊंटन’ आणि ‘लेझर लाईट शो’ उभारण्यात येणार असून, या कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या उपस्थितित करण्यात आली.
यावेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा तसेच प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खांब तळ्याचे सुशोभीकरण करून खेड शहरात आकर्षक पर्यटन व विरंगुळा केंद्र विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
स्थळ पाहणीदरम्यान ना. कदम यांच्या समवेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिखणे तसेच संबंधित विभागाचे तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाच्या कामाला गती देऊन पुढील एक महिन्याच्या आत प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश ना. कदम यांनी यावेळी दिले.
खांब तळ्याचे सुशोभीकरण, वॉटर म्युझिक फाऊंटन आणि लेझर लाईट शोमुळे शहरवासीयांसह पर्यटकांसाठी एक आकर्षक पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे खेड शहराच्या सौंदर्यात तसेच पर्यटनाच्या दृष्टीने शहराच्या नावलौकिकात मोठी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button