गणेशोत्सवापूर्वी राजापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष स्नेहा रहाटे यांचे नगरपरिषदेला निवेदन

राजापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर शहरातील खड्डेमय व धोकादायक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या राजापूर शहराध्यक्ष सौ. स्नेहा दिलीप रहाटे यांनी राजापूर नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वासू काका जोशी पुलाकडून आर. एस. पी. एम. शाळा, आय.टी.आय. तसेच आंबेवाडीच्या दिशेने जाणारा रस्ता सध्या मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून रस्त्याची अवस्था चिखलमय झाली आहे. त्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक, पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
खड्ड्यांमध्ये साचलेले चिखलाचे पाणी वाहनांच्या चाकांमुळे विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या अंगावर व कपड्यांवर उडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाचेही नुकसान होत आहे. तसेच दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी रहाटे यांनी केली आहे.
याशिवाय धोपेश्वर घाटी परिसरातील पाटील कॉम्प्लेक्स ते नांदलसकर दुकानापर्यंतचा पादचारी मार्गही नादुरुस्त व धोकादायक झाला आहे. या मार्गावरून गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तींची ने-आण तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहणार असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा पादचारी मार्गही गणेशोत्सवापूर्वी तातडीने व कायमस्वरूपी दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जवाहर चौक रिक्षा स्टँडपासून रानतळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खडपेवाडी येथील भाटकर घरापर्यंतचा रस्ताही खड्डेमय व चिखलमय झाला आहे. या रस्त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील या सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण अथवा आवश्यक त्या पद्धतीने तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी सौ. स्नेहा रहाटे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक, गणेशभक्त आणि वाहनचालकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button