
साळवी स्टॉपचा कचरा समस्या दूर करण्यासाठी उद्यमनगर येथे घनकचरा प्रक्रिया आणि सीएनजी निर्मिती प्रकल्प
रत्नागिरी शहरातील कचरा व्यवस्थापनाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साळवी स्टॉप परिसरातील उघड्या जागेवर कचरा टाकण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उद्यमनगर येथे घनकचरा प्रक्रिया आणि सीएनजी निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, एमआयडीसीने प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
रत्नागिरी शहरातून दररोज विविध प्रकारचा सुमारे २२ टन कचरा संकलित केला जातो. यामध्ये ओला आणि सुका कचरा तसेच अन्य प्रकारच्या कचर्याचा समावेश आहे. यापूर्वी कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी साळवी स्टॉप परिसरातील उघड्या जागेचा वापर केला जात होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि प्रदूषणाची समस्या निर्माण होत होती. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर बनला होता.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि दररोज निर्माण होणार्या कचर्याचे प्रमाण लक्षात घेता कचर्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र जागा आणि अत्याधुनिक प्रकल्पाची आवश्यकता होती. यासाठी प्रशासन आणि नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू होते. अखेर एमआयडीसीने उद्यमनगर येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कचर्यावर केवळ प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. प्रकल्पामध्ये योग्य प्रकारे प्रक्रिया केलेल्या कचर्यापासून सीएनजी निर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनासोबतच पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीलाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे साळवी स्टॉप परिसरातील उघड्यावर कचरा टाकण्याची पद्धत बंद होण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील दुर्गंधी, अस्वच्छता आणि प्रदूषण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसंच कचर्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होऊन त्यातून उपयुक्त ऊर्जा निर्माण होणार असल्याने शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.
प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १२ कोटी रुपयांच्या निधीतून आवश्यक यंत्रसामग्री, प्रक्रिया केंद्र आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहरातून दररोज संकलित होणारा सुमारे २२ टन कचरा उद्यमनगर येथील प्रकल्पात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.




