
“…तर मी स्वत: जयपूरमध्ये शाळेसमोर आंदोलन करणार”; दिपकेंचा शाळा दुरुस्ती अन् हल्लेखोरांच्या अटकेसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम!
Abhijit Dipke 48 Hours Ultimatum Protest : जयपूरमध्ये सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आशुतोष रांका आणि इतर कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेला भाजपाचे गुंड जबाबदार असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. याप्रकरणी आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ४८ तासांत शाळा दुरुस्तीचे काम सुरु न केल्यास आणि भाजपाच्या गुंडांना अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा दिपकेंनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे.
सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला
सीजेपीने देशभरात शाळा दुरुस्त करा ही मोहीम हाती घेतली आहे. सरकारी शाळांची पाहणी करून तेथील दुरवस्था दाखवली जात आहे. पायाभूत सोयी-सुविधांची वाणवा असून त्याबाबत सरकारला जाब विचारला जात आहे. सीजेपीच्या या मोहिमेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. जयपूरमध्ये सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीच्या आशुतोष रांका आणि इतर कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी भाजपावर आरोप केला जात असून, संबधितांना अटक करण्याची मागणी दिपकेंनी केली आहे.
काय म्हणाले दिपके?
‘आशुतोष आणि त्यांच्या टीमला भाजपाच्या गुंडांनी मारहाण केली. म्हशींच्या गोठ्यात मुलांना शिकवले जात होते. हे आशुतोष आज उघडकीस आणणार होता. ४८ तासांत त्या शाळेला दुरुस्त करण्याचे काम सुरु केले जात नाही, भाजपाच्या गुंडांना अटक केले नाही तर, मी स्वत: जयपूरला जाऊन त्या शाळा दुरुस्तीचे काम सुरु होत नाही तोपर्यंत, शाळेसमोर आंदोलन करणार’, असा इशारा दिपकेंनी दिला. दिपकेंनी यावेळी नागरिकांना देखील या आंदोलनात सहभागी होण्याचे आणि जंतर मंतरप्रमाणे मागे न हटण्याच्या निर्धाराने जयपूरला येण्याचे आवाहन केले.
भाजपाला इशारा
दिपकेंनी यावेळी एका सरकारी परिपत्रकाचा देखील उल्लेख केला. ‘खराब, मोडक्या – तोडक्या शाळांचे फोटो काढू नयेत अशा प्रकारचे परिपत्रक काढण्यात आले आहे. ते देखील माघारी घेण्यात यावे’, अशी विनंती देण्यात केली. दिपकेंनी भाजपा देखील यावेळी इशारा दिला. ‘आमच्यावर कितीही हल्ले केले, तरी देखील आम्ही माघार घेणार नाही. शाळा तर आम्ही व्यवस्थित करणारच’, असे दिपके म्हणाले.




