
बनावट ट्रेडिंग ॲपच्या आमिषाने दांपत्याची ११.३७ लाखांची फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार
रत्नागिरी : कमी वेळेत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत कुवारबाव येथील एका दांपत्याची तब्बल ११ लाख ३७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘Julius Baer Mobile’ या बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून ते २३ जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरोपींनी दांपत्याशी संपर्क साधला. यातील आरोपी सोनल नाईक व कुणाल सोमय्या नावाच्या दोघांनी दांपत्याचा विश्वास संपादन करून IPO आणि OTC ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले.
यानंतर दांपत्याला ‘Julius Baer Mobile’ हे बनावट ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. ॲपवर सुरुवातीला गुंतवणुकीवर नफा मिळत असल्याचे भासवून दांपत्याला आणखी रक्कम गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आले.
काही काळानंतर कंपनीच्या नियमांचे कारण पुढे करत आणखी पैसे भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच रक्कम न भरल्यास अडचणी निर्माण होतील, अशा प्रकारे धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारात दांपत्याच्या संयुक्त बँक खात्यातून ११ लाख १७ हजार रुपये, तर पतीच्या वैयक्तिक खात्यातून २० हजार रुपये, अशी एकूण ११ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम सायबर भामट्यांनी हडप केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.
दरम्यान, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या ‘हमीचा मोठा नफा’ देण्याच्या ऑनलाइन ट्रेडिंग ऑफर्सपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणतेही ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची अधिकृतता तपासावी आणि अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून बँक खात्यातून पैसे पाठवू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.




