
शुभेच्छा कार्ड बनवण्यासाठी अॅप डाउनलोड केले; निवृत्त व्यक्तीला ८.६२ लाखांचा ऑनलाइन गंडा
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांचे कार्ड तयार करण्यासाठी मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करणे रत्नागिरीतील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले. अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या इंडसइंड बँकेतील मुदत ठेवीच्या (एफडी) खात्यातील तब्बल ८ लाख ६२ हजार ४०० रुपये सेव्हिंग खात्यात वळवून अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुहास सोहनी (टिळक आळी,रत्नागिरी) यांनी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार 15 ऑगस्ट रोजी सोहनी यांनी क्रॅप्टो ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करुन घेत स्वातंत्र्यदिनाच्या शूभेच्छा देण्यासाठी कार्ड तयार केले व तो ॲप अनइन्स्टॉल केला. परंतू त्यानंतर काही वेळाने अज्ञाताने फिर्यादी यांच्या बँकेतील एफडी खात्यावरुन एकूण8 लाख 62 हजार 400 रुपये बचत खात्यावर फिरवून ती रक्कम काढून घेतली. ही बाब सुहास सोहनी यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे




