
खेड तालुक्यातील ऐनवली-देऊळवाडी येथील वर्गखोल्यांची अवस्था भीषण, विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
खेड तालुक्यातील ऐनवली-देऊळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्थाच झाली आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच धडे गिरवावे लागत आहेत. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमुळे सद्यस्थितीत इ. १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग अंगणवाडीच्या एका खोलीत भरवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाने अनास्थाच दाखवल्याने पालकांची धास्ती वाढली आहे.
या प्राथमिक शाळेत इ. १ ली ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी शिकत आहेत. शाळेच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्थाच झाली आहे. दुरूस्तीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे पालकांची काळजी कायम आहे. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच अध्ययन करावे लागत आहे. माजी विद्यार्थ्यांनी ४ दिवसापूर्वीच वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केल्याचे समजते.
मात्र, प्रशासनाकडून वर्गखोल्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यापूर्वीच वर्गखोल्यांची दुरूस्ती होणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे कानाडोळाच करण्यात आला. याचमुळे सद्यस्थितीत अंगणवाडीच्या एका वर्गखोलीत वर्ग भरवण्याची नामुष्की ओढवली आहे. शिक्षण विभागाने ही बाब गांभिर्याने घेऊन वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.




