
लांजातील खड्ड्यांत चिखल नांगरणी; युवा सेनेचे अनोखे आंदोलन
लांजा शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन केले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. बैलगाड्यांसह झालेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कुक्कुटपालन केंद्रापासून तहसील कार्यालयापर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात पाणी व चिखल साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
महामार्गासोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट खड्ड्यांमध्ये चिखल नांगरणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेना उबाठा युवा सेनेचे लांजा तालुका युवा अधिकारी अभिजित राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाड्यांसह चिखल नांगरणी स्पर्धाही घेण्यात आली. स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी शेतकऱ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, अल्लाउद्दीन नेवरेकर, शहराध्यक्ष मोहन तोंडकरी, लक्ष्मण मोर्ये, राजू सुर्वे, बाबू गुरव, बाबा धावणे, चंद्रकांत शिंदे, मांडवकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवा सेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.



