
७६ दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर देवगड येथील समुद्रात मासेमारी हंगामाला अधिकृतपणे सुरुवात
७६ दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर काल देवगड येथील समुद्रात मासेमारी हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली. देवगड धक्क्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौका मालक, मच्छिमार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे कर्मचारी आणि सागरी सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत मासेमारी नौकांना हिरवा झेंडा दाखवून समुद्रात रवाना करण्यात आले.यावेळी मासेमारी नौकांची विधिवत पूजा करून परिक्रमा करण्यात आली. उपस्थित नौका मालक आणि मच्छिमार बांधवांना पुष्प देऊन नव्या मासेमारी हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर टप्प्याटप्प्याने नौका समुद्राच्या दिशेने रवाना झाल्या.
मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छिमार बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा समुद्रात जाण्याची संधी मिळाल्याने मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. देवगडसह परिसरातील अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्याने हंगामाच्या सुरुवातीने सागरी पट्ट्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



