स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचवर चक्क गुडघाभर पाण्यात ध्वजवंदन करण्याची वेळ. जाणून घ्या कुठला आहे प्रकार..

अलिबाग : देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करण्याची वेळ आली. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पाण्यातच उभे राहावे लागले. तिरंग्याला सलाम करताना विद्यार्थ्यांच्या पायाखाली चिखल आणि पाणी असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्यामुळे या शाळेतील पायाभूत सुविधांची अवस्था किती बिकट आहे, याची कल्पना येते.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी असलेली जागा अडवण्यात आल्याने ही समस्या निर्माण होत आहे. परिणामी पावसाळ्यात पाणी शाळेच्या परिसरात साचते. गेल्या २५ वर्षांपासून ही समस्या कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून शाळेत ये-जा करावी लागते. मात्र, एवढ्या प्रदीर्घ काळापासून समस्या कायम असतानाही तिच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सद्य परीस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुलांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने अपघात किंवा अन्य अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. साचलेल्‍या पाण्‍यातून विद्यार्थ्‍यांना रोजच ये जा करावी लागत असल्‍याने त्‍यांच्‍या आरोग्‍याचाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ तात्पुरती उपाययोजना न करता पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी ठोस उपाय करावा, अशी मागणी होत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिरंग्याला अभिमानाने सलाम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पायाशी गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र समोर आल्याने प्रशासनाच्या पायाभूत सुविधांच्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. २५ वर्षांपासून समस्या कायम असेल, तर संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने का पाहिले नाही? असा सवाल आता पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाला जाग येणार का, तसेच शाळेच्या परिसरातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button