जात पडताळणी कार्यालयाची चांगली कामगिरी, ७५ टक्के अर्जांचा निपटारा


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, नोकरी आणि विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला रत्नागिरी जात पडताळणी कार्यालयाने मोठी गती दिली आहे. जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी तब्बल ६ हजार १९१ अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४ हजार ३९ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत.
मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होऊनही समितीने कार्यतत्परतेने प्रकरणांचा निपटारा केला आहे. सध्या केवळ ५५७ अर्ज प्रलंबित असून, त्यांच्यावरही नियमानुसार लवकर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पडताळणीदरम्यान नियमाची पूर्तता न झाल्याने किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने केवळ चार अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
समितीचे अध्यक्ष शंकर बर्गे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी प्रभावी समन्वय साधत ही कामगिरी केली आहे. अर्जदारांना कोणत्याही अनावश्यक दिरंगाईशिवाय जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे यासाठी कार्यालयाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेषतः शैक्षणिक प्रवेशाचा कालावधी तसेच नोकरीतील नियुक्तीच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये नात पडताळणी प्रमाणपत्राला मोठे महत्त्व असते. त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र मिळणे विद्यार्थ्यांसह उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक ठरते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button