
पालीतील लॉजवर वेश्या व्यवसायप्रकरणी पोलिसांची कारवाई; एक महिला ताब्यात
रत्नागिरी : अनैतिक मानवी व्यापार व वेश्या व्यवसायास प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे पाली येथील एका लॉजवर छापा टाकला. या कारवाईत वेश्या व्यवसायासंदर्भात एका महिलेकडून रोकड आणि मोबाईलसह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’मध्ये महिलांना आणून ग्राहक उपलब्ध करून देत वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे आणि महिला कक्षातील अधिकारी व अंमलदारांनी पंच व बोगस ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला.
कारवाईदरम्यान लॉजमधील एका खोलीत एक महिला आढळून आली. चौकशीत दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच ग्राहकाकडून वेश्यागमनासाठी घेतलेली २ हजार रुपयांची रोकड संबंधित महिलेच्या ताब्यातून पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.
या कारवाईत पाच सीलबंद निरोध पाकिटे, २ हजार रुपये रोख आणि सुमारे ५ हजार रुपये किमतीचा Vivo कंपनीचा मोबाईल, असा एकूण ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित महिला आर्थिक लाभासाठी बाहेरील शहरांतून इतर महिलांना रत्नागिरी येथे बोलावून लॉजमध्ये ग्राहक उपलब्ध करून देत असल्याचे तसेच त्यातून मिळणाऱ्या रकमेतून संबंधित महिलांना ठराविक रक्कम देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४३ (२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स.पो.नि. शबनम मुजावर, पोउनि. संदीप ओगले, म.स.पो.फौ. स्वाती राणे, म.पो.हवा छाया चौधरी, पो.हवा विजय आंबेकर, पो.हवा गणेश सावंत आणि चालक पो.शि. अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.




