चिपळूणच्या वाशिष्ठी पुलाचे शेवटचे गर्डर बसवण्याचे काम पूर्ण,वाहतुकीसाठी पूल खुला होण्याची प्रतीक्षा; महिनाभर ते दीड महिन्यात सुरू होण्याची शक्यता


मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाचे शेवटचे गर्डर बसवण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित या पुलाच्या कामाने आता अंतिम टप्पा गाठला असून, पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची प्रतीक्षा आहे.

पुलाच्या मुख्य भागातील गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. मात्र, चिपळूण शहरातील प्रांत कार्यालयासमोरील बाजूस पुलाला जोडणाऱ्या अप्रोच रोडचे काम अद्याप शिल्लक आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता नसली, तरी उर्वरित कामाचा वेग पाहता येत्या महिनाभर ते दीड महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाशिष्ठी नदीवरील या पुलामुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, चिपळूण शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याकडे वाहनचालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button