आंबेत पूल पुन्हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला; २० टन वजनापर्यंतच्या वाहनांना परवानगी

◾दापोली:- रत्नागिरी व रायगड जिल्हा जोडणाऱ्या आंबेत पूल परिसरातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंबेत पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदील दिला आहे. पुलाची तपासणी करून सादर करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत पूल हा रा.मा. १०९ वरील महत्त्वाचा दुवा आहे. दि. ६ जुलै २०२६ रोजी सावित्री खाडीमध्ये दोन मोठ्या बार्जची धडक पुलाला बसल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती.
यानंतर दि. १२ जुलैपासून पुलावरून दुचाकी व हलकी चारचाकी वाहने नियंत्रित पद्धतीने सोडण्यात आली होती. दरम्यान, पुलाच्या पाण्याखालील भागाची तांत्रिक पाहणी करण्यात आली.
दि. ११ ऑगस्ट रोजी मे. प्लॅनिस टेक्नॉलॉजी प्रा. लि. चेन्नई यांनी पुलाच्या पायाभागाखालील सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला. या अहवालानुसार आंबेत पुलावरून २० मेट्रिक टन वजनापर्यंतची सर्व प्रकारची वाहने ताशी २० किलोमीटर वेगमर्यादेत सुरू करण्यास विभागाची हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे आंबेत पुलावरून आता सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दापोली, मंडणगड, म्हसळा तसेच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत रायगड व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांसह दापोली, मंडणगड व म्हसळा येथील संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन आवश्यक दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button