
जॅकफ्रूट किंग’ मिथिलेश देसाई यांची नरेंद्र मोदी यांच्याशी भेट; ‘फणस वर्ष’ घोषित करण्याची आग्रही मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे गावचे प्रगतशील शेतकरी आणि ‘जॅकफ्रूट किंग’ म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांनी पंतप्रधान यांची भेट घेत फणस शेती, फणस प्रक्रिया उद्योग आणि त्याभोवती निर्माण होणाऱ्या कृषी परिसंस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. फणसाला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळावी आणि त्याच्या मूल्यवर्धनाला चालना मिळावी, यासाठी देसाई यांनी पंतप्रधानांकडे विविध मागण्या मांडल्या.
वडिलांनी सुरू केलेल्या फणस शेतीच्या कार्याला पुढे नेत गेल्या अनेक वर्षांपासून देसाई सातत्याने विविध प्रयोग करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत ज्येष्ठ नेते यांनी ही महत्त्वपूर्ण भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे फणस शेती आणि त्यावरील प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या क्षेत्रात देसाई करत असलेल्या कामाची माहिती दिली.
‘भारताचे फणस वर्ष’ घोषित करण्याची मागणी
पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत देसाई यांनी भारतातील फणस उत्पादनाची क्षमता, त्यातील प्रक्रिया उद्योगाच्या संधी आणि फणस मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची समस्या याबाबत माहिती दिली. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर फणस उपलब्ध असून योग्य प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाअभावी त्यातील मोठा हिस्सा वाया जातो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
फणसाची देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ मोठी असून या पिकाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष धोरण आखावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आगामी वर्ष ‘भारताचे फणस वर्ष’ म्हणून घोषित करावे, अशी आग्रही विनंतीही त्यांनी पंतप्रधानांकडे केली.
फणसापासून विविध नाविन्यपूर्ण उत्पादने
या भेटीदरम्यान फणसापासून तयार करण्यात आलेल्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये फणसाचे पीठ, प्रथिनयुक्त फणस बीज पीठ, पिकलेल्या फणसाचे चिप्स यांसह फणसाच्या सालीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंचाही समावेश होता.
फणसाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या डफल बॅग, पासपोर्ट होल्डर यांसारख्या उत्पादनांमधून कृषी कचऱ्याचा प्रभावी वापर करून रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, याची माहिती देसाई यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमांची आणि उत्पादनांची आस्थेने माहिती घेतली. तसेच सादर करण्यात आलेली कागदपत्रे व उत्पादने स्वीकारून या संपूर्ण उपक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
लांजाच्या शेतातून दिल्लीपर्यंतचा प्रवास
लांजा तालुक्यातील झापडे या गावातून सुरू झालेला फणस शेतीचा प्रयोग थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात या भेटीची चर्चा सुरू झाली आहे. कोकणातील पारंपरिक पिकाला आधुनिक प्रक्रिया उद्योगाची जोड देत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल मिथिलेश देसाई यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. वडिलांच्या स्वप्नाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याने ही भेट आपल्या कुटुंबासह लांजा, रत्नागिरी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली.



