
मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिजजवळ दुचाकीचा अपघात; दोघे जखमी
कशेडी ट्रॅप वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी रेल्वे ब्रिज येथे दुचाकीचा अपघात होऊन दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६.३४ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कशेडीहून चिंचवलीच्या दिशेने अॅक्टिव्हा स्कूटरवरून दोघे प्रवास करत होते. खवटी रेल्वे ब्रिजजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात वैभव पिंपळकर (वय २७) आणि ऋषिकेश पिंपळकर (वय २३), दोघेही चिंचवली- सिंगरवाडी येथील रहिवासी, जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधामची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कशेडी ट्रॅप वाहतूक पोलिसांच्या मदतीने दोन्ही जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णवाहिकेचे चालक सूरज हंबीर यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास सहकार्य केले. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण तसेच पुढील कारवाईबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेण्यात येत आहे.



