
“विधानसभा घेराव”, झारखंडमध्ये पेपरफुटी विरोधातील आंदोलन तीव्र; विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, भाजपा नेते पोलिसांच्या ताब्यात!
: झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुकारलेले आंदोलन तीव्र झाले असून, आंदोलनकर्त्यांनी आज विधानसभा भवनाच्या दिशेने मार्च सुरु केला आहे.
‘विधानसभा घेराव’ मार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी ओलांडले असून, विधानभवनाच्या दिशेने मार्च सुरुच ठेवला आहे. आजच्या मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी झारखंडमधून हजारो विद्यार्थी राजधानी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरु केल्यानंतर काही नेत्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विधानभवनाच्या दिशेने मोर्चा
झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह इतर सरकारी परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप करत गेल्या काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आज हजारो विद्यार्थ्यांनी विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढला आहे. रांचीमधील कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेता पोलिसांनी अनेक संवेदनशील ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत. तसेच, महत्वाचे रस्ते, चौकात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
भाजपा नेत्यांना घेतलं ताब्यात
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या विविध जिल्ह्यातून हजारो तरुण, विद्यार्थी ट्रेन, बस आणि इतर मार्गांनी राजधानी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांकडून बस, वाहनांची सीमावर्ती भाग आणि प्रमुख रस्ते, महामार्गांवर कसून तपासणी केली जात आहे. मोठ्या संख्येने आंदोलकांनी विधानभवनाच्या दिशेने मार्च करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनी देखील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानााबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी भाजपा नेते आदित्य साहू, बाबूलाल मरांडी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.
चर्चा निष्फळ
झारखंड लोकसेवा आयोगाच्या वतीने सरकारी नोकरीभरतीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात या परीक्षांमध्ये पेपरफुटीचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यासह झारखंड स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांवर देखील प्रश्न उपस्थित करत गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. सरकारी शिष्टमंडळाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, आंदोलकांचे मन वळविण्यास त्यांना यश आले नाही.
रविवारी देखील झालेली चर्चा निष्फळ ठरली. आंदोलकांनी पेपरफुटी आणि गैरव्यवहारांप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने आंदोलकांच्या ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.
आंदोलक मागण्यांवर ठाम
आंदोलक विद्यार्थ्यांनी मात्र त्यांनी मागणी केलेल्या १३ परीक्षांपैकी सरकारने केवळ तीनच परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली असल्याचे म्हटले आहे. तसेच, जेपीएससी-जेएसएससी सुधारणा मंचचे नेते रवींद्र पासवान यांनी सीबीआय चौकशीच्या आपल्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, जेपीएससीचे अध्यक्ष एल. खियांगटे यांनी यापूर्वी २२ जुलै रोजी राजीनामा दिला आहे.




