कोट्यवधींचा खर्च, नव्या पुलांना तडे; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह


मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले असतानाच नव्याने उभारण्यात आलेल्या पुलांना तडे आणि भगदाडे पडल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वडखळ, नागोठणे आणि लोणेरे परिसरातील पुलांच्या स्थितीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

वडखळ बायपासवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या स्लॅबला भगदाड पडल्याचे समोर आले. स्लॅबचा काही भाग कोसळल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. घटनेनंतर महामार्ग प्राधिकरणाने रातोरात भगदाड बुजवून तात्पुरती डागडुजी केली.

नागोठणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालाही तडे गेल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत हा पूल बंद करण्याची वेळ आली. पुलाची तांत्रिक पाहणी करण्यासाठी दिल्लीहून विशेष पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे.

लोणेरे येथील पुलावरही कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलावर पडलेल्या भगदाडांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. महामार्ग विभागाकडून या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले तरी नव्या बांधकामांची अशी अवस्था होत असल्याने महामार्गाच्या कामावर टीका होत आहे.

सेवा रस्त्यांचीही दुरवस्था

नागोठणे, कोलाड आणि वडखळ परिसरातील सेवा रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्यांची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

गणेशोत्सवापूर्वी माणगावच्या बाह्यवळण रस्त्याची किमान एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पावसामुळे कामाचा वेग मंदावला असून, या मार्गावर कोकण रेल्वेच्या मार्गावरून पूल जाणार असल्याने तुळई टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.

१५ वर्षांपासून महामार्गाचे काम रखडलेले

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला २०११ मध्ये, तर दुसऱ्या टप्प्यातील कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. मात्र दीड दशकाचा कालावधी उलटत आला तरी महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होते आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित प्रवासाची आश्वासने दिली जातात. काम पूर्ण करण्यासाठी वारंवार नवीन मुदती जाहीर केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला दिसत नाही.

याच पार्श्वभूमीवर रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांनी महामार्गाची पाहणी करून आढावा बैठक घेतली. त्यानंतर महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथे स्वतंत्र आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महामार्गाची पाहणी केली. गणेशोत्सव जवळ आला की पाहणी दौरे आणि आढावा बैठका वाढतात; मात्र प्रत्यक्ष काम पूर्ण होण्याचा प्रश्न कायम असल्याची टीका होत आहे.

‘महामार्गाला कोणी वाली नाही’

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मोठमोठ्या कॉरिडॉर आणि शक्तिपीठ मार्गाच्या घोषणा होत असताना गेल्या १५ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नसल्याचे त्यांनी म्हटले. वडखळ-अलिबाग सेवा रस्त्याची दयनीय अवस्था असून, संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीचा निषेध करावा तेवढा थोडा असल्याची टीकाही त्यांनी केली.

पेव्हर ब्लॉकऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज : तटकरे

राष्ट्रीय महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसवणे अपेक्षित नसतानाही वडखळ, नागोठणे आणि कोलाड परिसरात पेव्हर ब्लॉक बसवले जात असल्याचे महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. पेव्हर ब्लॉकऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्ड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न : गोगावले

माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे कामाचा वेग काही काळ मंदावला होता. बाह्यवळण मार्ग कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणार असल्याने तुळई टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे. ते वेळेत मिळाल्यास काम पूर्ण करण्यास मदत होईल, असे गोगावले यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button