
आंबाघाटातून अवजड वाहनांना बंदी; बॉक्साईट, साखर, कोळसा वाहतुकीवर परिणाम
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबाघाट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या भेगा आणि संवेदनशील झालेल्या भागाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातलीत्यामुळे रत्नागिरी व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दररोजची सुमारे ९०० ट्रकची वाहतूक ठप्प झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून रोज सुमारे ५०० ट्रक, तर कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ४०० ट्रक विविध औद्योगिक व कृषी माल घेऊन या मार्गावरून प्रवास करतात; मात्र घाटातील धोकादायक परिस्थितीमुळे ही वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे बॉक्साईट, साखर, कोळसा यांसारख्या महत्त्वाच्या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. वाहतुकीचा कालावधी वाढल्याने मालवाहतूक खर्चात वाढ होणार आहे. हलक्या वाहनांची तसेच अत्यावश्यक सेवांतील वाहनांची वाहतूक मात्र सुरू असल्याने एसटीसह भाजीपाला वाहतूक सुरू आहे.दरम्यान, वाहनचालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने घाटातील धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.




