
ग्रामीण भागातील गणेशमूर्ती चित्रशाळा गजबजल्या
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गणेशमूर्ती चित्रशाळा सध्या चांगल्याच गजबजल्या आहेत. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनासाठी मूर्तीकार अंतिम तयारीत व्यस्त असून अनेक ठिकाणी गणेशमूर्तीना रंगरंगोटीचा अंतिम साज चढविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
चित्रशाळांमध्ये सध्या मातीकाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, सुबक आणि आकर्षक मूर्ती साकारण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. काही ठिकाणी मूर्तींना रंगाचा मुलामा देण्यास सुरुवात झाली असून या देखण्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची चित्रशाळांकडे गर्दी होत आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण मानला जातो. संगमेश्वर तालुक्यातील अनेक तरुण रोजगार, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य शहरांमध्ये वास्तव्यास असले तरी गणेशोत्सवासाठी ते आवर्जून आपल्या गावी परततात. त्यामुळे वर्षभर शांत भासणारी गावे गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा एकदा उत्साहाने फुलून जातात.
यंदा १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने प्रत्येक घरात आणि गावागावांत उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तीकार आणि त्यांचे सहकारी प्रत्येक मूर्तीला आकर्षक रूप देण्यासाठी अंतिम स्पर्श करण्यात व्यस्त आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी चित्रशाळांमधील लगबग आता दिवसेंदिवस वाढत असून, बाप्पाच्या आगमनाची चाहूल संपूर्ण परिसरात लागली आहे.




